top of page

अस्तित्व- भेटलेली माणसे

एवढ्या गजबजलेल्या शहरात ह्या रिकाम्या राहिलेल्या जमिनीवर काँक्रिटचे ठोकळे रचले जाणार होते, त्या घरांमध्ये अनेक लोकं त्यांची स्वप्न घेऊन राहायला येणार होते. मी जिथे काम करायचो त्या कंपनीला ती इमारत बांधायचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते आणि माझी नेमणूक त्या ठिकाणी झाली होती.  त्या साईटवर एका कोपऱ्यात एक हॉटेल होतं. दहा बाय दहाच्या जागेवर चारी बाजूला पत्रे मारलेले, समोर बसायला लाकडी बाकडे, शेवटचे क्षण मोजत असल्यासारखा हळू हळू फिरणारा छोटा पंखा; या अशा वस्तूला आजकाल लोकं कदाचित हॉटेल म्हणणार नाहीत. तिथेच बाजूला एक गाय आणि वासरू बांधलेलं होतं. पांढरा शर्ट, धोतर, कपाळावर गंध लावलेले वयाने थकलेले हॉटेल मालक, आणि त्यांची साथ द्यायला त्यांच्या पत्नी तिथे होत्या.


मी नवीन ठिकाणी गेलो की एकटाच राहत असल्यामुळे पहिला शोध सुरु व्हायचा तो म्हणजे जेवणाचा, मेस शोधणे. त्या हॉटेलमध्ये फक्त चहा नाष्टा मिळत असे. पण मी आग्रह केल्यावर ते मला दुपारचं जेवण द्यायला तयार झाले. आम्ही जे खातो त्यात अजून थोडं जास्त बनवून तुम्हाला पण देऊ असं त्यांनी सांगितलं. रोज कामाच्या किरकिरीतून त्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो की माझा वेळ मस्त जात असे. त्यांच्या दोन नाती शाळेतून दुपारी तिथे येत असत. जेवण करून थोडा वेळ त्यांच्यासोबत खेळण्यात जात असे. त्या आजी गरम गरम भाकरी बनवत असायच्या आणि आजोबा मी नको म्हणलं तरी ताटात अजून एक भाकरी वाढायचे. बाकी हॉटेलमध्ये जेवण सर्व्ह केलं जातं आणि इथे जेवण वाढलं जात असे. कधी कधी वाटीभर दूध देऊन कुस्करून खा पोटभर आपल्याला कुठं विकत आणायचं आहे घरच्याच गायीचं आहे असं सांगून आग्रह केला जात असे. बाहेर हॉटेलमध्ये किती मिलीचा ग्लास किती रुपयाला हे ठरलेलं असतं, तसला हिशोब इथे केला जात नव्हता.


माणसाला मन मोकळं करायला कोणी ना कोणी हवं असतं. दुःख सांगितल्याने कमी होतं म्हणतात. अशाच गप्पांमधून कळलं की फार पूर्वीपासून या मोकळ्या जागेची देखरेख करण्यासाठी जागा मालकाने त्यांना इथे ठेवले होते. त्यानंतर जसं जसे जागांचे भाव वाढत गेले तसे आता या मोकळ्या जागेवर भव्य इमारत उभी करण्याचे जगमालकाने ठरवले होते. इतकी भव्य की माणुसकी पण त्यापुढे खुजी वाटेल. इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत त्यांना इथे हॉटेल चालू करू दिले होते. त्या आजोबांचा काही वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक कर्ता मुलगा अपघातात गेला. म्हणून आता या वयात ते हॉटेल चालवत होते. त्यांची सून काही छोटी घरकाम करत असे. दोन्ही नातींच्या शिक्षणाचा खर्च होता आणि असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे होते.


एका दुपारी जेवायला गेलो तेव्हा कळाले आदल्या रात्री त्यांची गाय कसल्याश्या आजाराने मेली होती. वासराचा हंबरडा आणि आजींच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. आपण छोट्या छोट्या गोष्टींचं किती टेन्शन घेतो, नशिबाला स्वतःच्या नशिबाला किती दोष देत बसतो, देव आपलीच का परीक्षा घेतो म्हणून रागावतो. पण हे दोघे, किती आघात यांनी आयुष्यभर सहन केले असतील, तरी अजूनही उमेदीने जगत आहेत. चार पुस्तकं वाचून शिक्षण घेऊन आपण उगाच स्वतःला फार शहाणे समजतो, पण आयुष्य जगायला असलं पुस्तकी शहाणपण उपयोगात येत नाही. ही अशी लोकं शिक्षण नसले तरी आयुष्याच्या वाटेवर अनेक परीक्षा देत शांतपणे पुढे जात असतात.


तिथे आजूबाजूला असणाऱ्या एवढ्या मोठ्या चकचकीत इमारतींच्या दृष्टीने त्या पत्र्याच्या गळक्या हॉटेलचे काही अस्तित्व नव्हते, पण त्या दोघांच्या दृष्टीने ते हॉटेल म्हणजेच त्यांचे सारे विश्व होते. पुढे काही कारणाने मला कायमचे दुसऱ्या साईटवर जावे लागले. मीही कधी इच्छा असूनही वाट वाकडी करून पुन्हा त्यांना भेटायला गेलो नाही, उगाचच आपण फार व्यस्त असं भासवून घेत घेऊन स्वतःचीच फसवणूक करत असतो. आता एवढ्या वर्षात कदाचित तिथल्या इमारतीचे काम पूर्ण झाले असेल, तिथून ते हॉटेल काढले गेले असेल. पण ते जोडपे जीवनाचा त्रागा न करता त्यातून मार्ग काढून जगत असतील. रक्ताच्या नात्यातील माणसे आयुष्यभर सोबत असतातच पण स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढणारे अशी माणसे त्यांच्या स्वभावामुळे कायम लक्षात राहतात.

Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
bottom of page